तथागत गौतम बुद्ध


🍂📖🌄🍃🍂📖🌄🍃🍂📖🌄

 🍂सुवर्णपानं इतिहासाची🍂

      तथागत गौतम बुद्ध
     (ई.पू.563-ई.पू.483)

       अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे,बौद्ध धर्माचे आद्य संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळ लुम्बिनी येथे शाक्य कुळात झाला.त्यांचे 'सिद्धार्थ' असे नाव होते.वडील शुद्धोधन,आई महामाया होती.जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशी महामाया यांचे निधन झाले.आई छत्र हरवलेल्या बुद्धांचे पूर्ण पालनपोषण सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केले.म्हणून त्यांना गौतम असेही म्हणत.राजकुमार असलेल्या सिद्धार्थ लहान असतांना विद्वानांची भविष्यवाणीने राजा शुद्धोधनाची चिंता वाढवून गेली."हा मुलगा मोठा झाल्यावर महान राजा होईल अन्यथा महान धर्म गुरू होईल".

         विद्वानांची भविष्यवाणी आणि राजा शुद्धोधनाची चिंता नवीन महान प्रेषित घडवणार होती.राजा शुद्धोधनाची सिद्धार्थ राजा व्हावा यासाठी बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क होऊ दिला नाही.सर्व सोयीसुविधा राजवाड्यातच करून ठेवल्या.जगात सर्वदूर सुख आहे.आनंद आहे आणि हेच जीवन आहे.दुःख,यातना,शोक यांचा साधा लवलेशही सिद्धार्थाच्या आजूबाजूला नव्हता.तशी काळजी राजा आणि मंत्रीमंडळ घेत होते.तशा सुचनाही राजाने दिल्या होत्या.

       एकदा सिद्धार्थ जंगलात गेले.तेथे त्यांना जखमी हंस भेटला.त्यांनी त्यास पाणी पाजले.त्याचवेळेस तेथे त्यांचा चुलत भाऊ देवदत्त आला आणि ही शिकार माझी आहे म्हणून देण्यास सांगू लागला.सिद्धार्थ देण्यास तयार नव्हता.हे प्रकरण देवदत्तच्या तक्रारीनुसार राजा शुद्धोधनकडे गेले.शुद्धोधनांनी सिद्धार्थास हंस देवदत्तला देण्यास सांगून शिकार त्याने केली असे सांगितले.तेव्हा सिद्धार्थाने सांगितले,"पिताश्री,माफ करा.हंस आकाशात उडत होता.त्यास मारण्याचा अधिकार कोणी दिला?हंसाने देवदत्तचं काय केलं होतं?त्याच्यावर बाण का चालविला?त्याला रक्तबंबाळ का केलं?".मला हंसाचं दुःख बघितलं जात नव्हतं म्हणून मी त्यास पाणी पाजले.त्याची सेवा केली.त्याला जीवन दिले.म्हणून त्यावर अधिकार माझाच असावा.मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा कधीही श्रेष्ठ असतो.ही बाब राजासही मनोमन पटली अन् त्यांनी हंस सिद्धार्थास दिला.कोणालाही दुःख द्यायचे नाही आणि कोणाचेही दुःख त्यांच्याकडून लहानपणापासून बघितले जात नव्हते.द्या आणि करूणा त्यांच्यात ठासून भरलेली होती असे लहानपणाच्या अनेक उदाहरणांवरून लक्षात येते.

      दिवसामागून दिवस जात होते.वयाच्या 16 व्या वर्षी यशोधराशी लग्न झाले.त्यांना मुलगा झाला.त्याचे नाव राहुल ठेवले.राजा शुद्धोधनाने सिद्धार्थसाठी सर्व सोयीसुविधा केल्या पण एकेदिवशी व्हायचे ते झालेच.सिद्धार्थ एके दिवशी राजमहालाबाहेर पडला आणि म्हातारा,आजारी मनुष्य,शवयात्रा आणि संन्यासी अशी चार वेगवेगळी दृश्य त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली.नवीन जगाचा भास त्यांना झाला.जगात स्वतःचा शोध घ्यावा यासाठी त्यांनी वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला.

         आलारकलाम हे प्रथम गुरू भेटले.त्यांच्यापासून शिक्षण घेतले.रूद्रकरामपुत्त हे दुसरे गुरू. पुढची सहा वर्षे त्यांनी तपश्चर्या केली.खूप संकटांना सामोरे गेले.शरीराला कष्ट देऊन देवाची प्राप्ती होत नाही हे त्यांनी जाणले.कौडिण्य,वप्पा,भादिया,महानामा व अस्सागी हे पाच अनुयायी भेटले आणि अन्न ग्रहण केले म्हणून अनुयायी सोडून गेले.तब्बेत खराब झाली.ते हरले नाहीत.वयाच्या 35 व्या वर्षी बिहारमध्ये बोधगया येथे शेवटी 49 दिवसांच्या कठोर तपस्येने ठरवलेले अंतिम सत्य 'ज्ञान' पिंपळाच्या झाडाखाली-बोधिवृक्ष निरंजनानदीजवळ त्यांना गवसले.पूर्ण ज्ञानाचा प्रकाश त्यांना दिसला.अन् ते बुद्ध झाले.बुद्ध म्हणजे जो जागृत आहे.

     गौतम बुद्ध यांना मन व शरीर स्वास्थ्यासाठी भूतकाळाबद्दल शोक करू नये,भविष्याची चिंता करू नये तर वर्तमान क्षण जगून घ्यावेत हे समजले होते.सोडून गेलेल्या सहकाऱ्यांना सर्वप्रथम त्यांनी पहिले प्रवचन दिले ते सारनाथ येथे.त्यास धम्मचक्रपरिवर्तन म्हणतात. त्यांनी पंचशील तत्त्वे, आर्यसत्ये,आष्टांग मार्ग  सांगितलीत.दुःख,कारण,निरोध आणि मार्ग ही आर्यसत्ये होती.पुढे त्यांच्या अनुयायांनी बौद्ध संघ स्थापन केला.त्यांनी पाली भाषेत उपदेश केला.त्यांचे अनुयायी भिक्षुक व उपासक होते.ते तीन घोषणा देत.बुद्धं शरणं गच्छामी,धम्मम शरणं गच्छामी,संघम शरणं गच्छामी.बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होऊ लागला.कौशल,कौशांबी व वैशाली राज्यात त्यांनी पाली भाषेत उपदेश दिलेत.बौद्ध धर्माचा त्रिपिठक हा प्रमुख ग्रंथ आहे.बौद्ध धर्माचे तीन त्रिरत्ने आहेत बुद्ध,धम्म,संघ.गौतम बुद्धांनी मध्यम मार्गाचा उपदेश केला आहे.बुद्धांनी सत्य आणि अहिंसेचा उपदेश केला.स्वतःवर प्रेम म्हणजे दुसऱ्यांवर प्रेम करणे.कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.अगदी मी सांगितले तरी.त्यांनी जगात सुर्य,चंद्र आणि सत्य लपू शकत नाही असे सांगितले.
      
        एकदा प्रवचन दरम्यान 'जागे व्हा,वेळ निघून जात आहे' असा उपदेश केला.शिष्य आनंद सोबत थोडे फिरावे म्हणून विहाराच्या मुख्य दरवाजाजवळ थांबले.तेव्हा एक एक व्यक्ती बाहेर पडत होती.त्यापैकी एका स्रीने सांगितले,की आज माझा नृत्याचा कार्यक्रम सेठकडे होता.मला आठवण नव्हती.बरे झाले आपण सांगितले वेळ निघून जात आहे,तेव्हा मला आठवण झाली.तसाच एक डाकूही बुद्धांना म्हणाला,तुमच्याजवळ काय लपवायचे आज मी एके ठिकाणी चोरी करणार होतो.मला ती योजना तुमच्या उपदेशाने आठवली.धन्यवाद देऊन तो निघून गेला.तेव्हाच एक म्हातारा येऊन म्हणाला,की आजपर्यंत जीवन हे ऐशोआरामात गेले.आता निर्वाणासाठी झटेन.माझे डोळे उघडलेत बघा.तेव्हा बुद्ध आनंदला म्हणाले,"पाहिलत आनंद, उपदेश एक होता पण सर्वांनी त्यांच्यापरीने त्यांच्या जीवनाशी संबंध जोडला".निर्वाण प्राप्तीकरिता मनाची झोळीही लायक असावी.म्हणून मन शुद्ध असावे.

       जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला.वयाच्या 80 व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले.प्राचीन काळापासून भारतासह जगभरात बौद्ध धर्माचा प्रसार झाला.जगाच्या इतिहासात तथागत बौद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.इतिहासातील प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे स्थान अग्रस्थानी आहे.बुद्धांचे उपदेश जीवनाला दिशा देऊन जातात.
"आपण जे आहोत ते आतापर्यंतच्या विचारांचाच परिणाम आहे.कोणतेही काम करतांना वाईट विचार मनात असतील तर वाईटच होईल आणि काम करतांना चांगले विचार मनात असतील तर कायम आनंद सावलीसारखा आपल्या सोबतच राहिल".

📝श्री.भरत विठ्ठल पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर 
ता.मालेगाव जि.नाशिक 
📱 9665911657 
📧 bharatpatil7988@gmail.com


🍂📖🌄🍃🍂📖🌄🍃🍂📖🌄

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज

वर्धमान महावीर