वर्धमान महावीर
♻⚜🍂♻⚜🍂♻⚜🍂♻⚜
सुवर्णपानं इतिहासाची
भगवान महावीर
(इ.स.पू.599- इ.स.पू 527)
अहिंसेचे प्रतिक,जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर होय.जैन धर्म तेवीसवे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांच्या निधनाच्या 278 वर्षानंतर महावीरांचा जन्म झाला.भगवान ऋषभ देवांपासून तीर्थंकरांची सुरू झालेली परंपरा शेवटचे तीर्थंकर म्हणून महावीरांपर्यंत येऊन पोहोचते.
वर्धमान महावीरांचा जन्म अडीच हजार वर्षापूर्वी वैशाली गणराज्याच्या कुंडग्राम या गावी झाला.महावीरांचे मूळ नाव वर्धमान असे होते.त्यांचे वडील सिद्धार्थ तर आई त्रिशला होती.त्यांच्या भावाचे नाव नंदिवर्मन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते.त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले.कल्पनासुत्र नावाच्या ग्रंथात वर्धमान महावीरांच्या जन्मोत्सवाविषयी व घडलेल्या घटनांविषयी माहिती आहे.जैन ग्रंथ उत्तरपुराणात वर्धमान,वीर,अतिवीर,महावीर आणि सन्मति अशा त्यांच्या पाच नावांचा उल्लेख आहे.
दिगंबर पंथाच्या म्हणण्यानुसार भगवान महावीर ब्रम्हचारी होते,तर श्वेतांबर पंथानुसार त्यांचा यशोदा यांच्याशी झाला होता.प्रियदर्शिनी नावाची त्यांना कन्या होती.
वर्धमान महावीर हे चिंतनशील व्यक्तीमत्व होते.त्यामुळे त्यांना राजघराण्याचे वैभव,भौतिक सुविधा,संसार आकर्षित करू शकल्या नाहीत.पुढे त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या मनातील सुखाचे आकर्षण कमी झाले.माणसाच्या जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक आहे याची जाणीव त्यांना झाली.दुःख निवारण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी वडीलबंधू नंदिवर्धन यांची परवानगी घेऊन वयाच्या 28 व्या वर्षी गृहत्याग केला.
पुढे खूप वेळ ते ध्यानात असत.बारा वर्षे कठोर तपश्चर्या करून त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांनी जनकल्याणाचे उपदेश दिलेत.अर्धमागधी भाषेचा उपयोग करत त्यांनी आपले संदेश जनमाणसांपर्यंत पोहोचविले.ज्या काळात हिंसा,पशुबळी,भेदभाव समाजात वाढले त्या काळातील महावीरांचे कार्य अवर्णनीयच.जैन धर्मातील पंचशील तत्त्वे ही जगाला मिळालेली देणगीच-सत्य,अहिंसा,अस्तेय,अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य.त्यांच्या प्रवचनाचे सार हे प्रेम,त्याग,संयम,करूणा,शील व सदाचार याच्यात सामावले होते.देशातील विविध भागात महावीरांनी भ्रमंती करून अनमोल विचारांचा,संदेशाचा प्रचार व प्रसार केला."जगा आणि जगू द्या" हा संदेश त्यांना जगाला दिला.
प्राचीन काळातील सम्राट बिंबीसार,अजातशत्रु,चेटक,चंद्रगुप्त मौर्य,संप्रती,सम्राट खारवेल इ.विविध राजे,चोल,चेर राजे,अमोघवर्ष प्रथम जैन धर्माचे अनुयायी होते.वर्धमान महावीर यांचे मुख्य शिष्यात इंद्रभुति गौतम,अग्निभूती,वायूभूती,अंकपित असे 11 प्रमुख शिष्य होते.दिगंबर व श्वेतांबर हे प्रमुख संप्रदाय जैन धर्मात असून दोन्हीही मानवतेचा महान संदेश देतात.जैन धर्मात क्षमेला परमोच्च स्थान आहे.संभेद्रिखर,पावापुरी,राजगिर,शत्रुंजय,श्रावणबेळगोळा,गिरनार इत्यादी जैन धर्माचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत.
जगभरात जैन धर्माचे अनुयायी,शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे वर्धमान महावीर यांचे महानिर्वाण इ.स.पू.527 मध्ये कार्तिक अमावस्येला बिहार राज्यातील पावापुरी येथे वयाच्या 72 व्या वर्षी झाले.
वर्धमान महावीरांनी आपल्या आंतरिक गुणांच्या सामर्थ्यावर नैतिक व व्यावहारिक जीवन यांचा समन्वय घडवून आणला.स्वतः शुद्ध राहत,इतरांनाही संदेश देणे प्रेरणादायीच.मानवतावादी संदेश देणारे इतिहासाचं हे सुवर्णपान अनोखचं..!
📝श्री.भरत विठ्ठल पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर
ता.मालेगाव जि.नाशिक
📱 9665911657
📧 bharatpatil7988@gmail.com
♻⚜🍂♻⚜🍂♻⚜🍂♻⚜

Comments
Post a Comment