भारताचा वीरपुत्र महाराणा प्रताप
भारताचा वीरपुत्र महाराणा प्रताप
(९ मे १५४० - १९ जानेवारी १५९७)
भारतपुत्र,मेवाड नरेश,देशभक्ती,स्वाभिमान,साहस,संघर्ष,दृढसंकल्प,मातृभूमी रक्षक,क्षत्रिय महाराणा प्रताप हे भारतीय इतिहासाला लाभलेलं सुवर्णपान.भारतीय इतिहासातील महान राजांपैकी एक असलेले महाराणा प्रताप यांचा जन्म राजपूत सिसोदिया वंशात उदयपूरचे संस्थापक राणा उदयसिंह व्दितीय आणि महाराणी जयवंताबाई यांच्या घरी कुंभलगड येथे झाला.महाराणा प्रतापांना लहानपणी 'कीका' नावाने हाक मारत असत.
महाराणा प्रताप हे वीर बालक होते.लहानपणापासूनच वडिलांपासून त्यांना स्वातंत्र्य,शौर्य आणि स्वाभिमान हे गुण मिळाले.त्यांना विविध खेळ खेळणे आणि घोडेस्वारी यांची खूप आवड होती.थोरले राजपुत्र असल्याने जनतेत त्यांच्या कतृत्वाची चर्चा होत होती.विविध शस्रास्रे चालविणे,शत्रूवर चढाई करणे यात ते तरबेज होत होते.आपल्या विविध गुणांमुळे त्यांनी आपल्या वडीलांचे मन जिंकले होते.महाराणा प्रतापांना शक्तीसिंह नावाचा भाऊ होता.महाराणा प्रतापांचा त्यास हेवा वाटे.
एकदा अफगाणी व्यापारी घोडे घेऊन राजधानीत आला.आपल्या मुलांना आवडीचे घोडे खरेदी करून द्यावेत म्हणून उदयसिंह यांनी महाराणा प्रताप व शक्तीसिंह यांना बोलावून घेतले.अफगाणी व्यापाऱ्याने घोड्यांचे गुण सांगितले.महाराणा प्रताप यांनी जंगली असलेला घोडा निवडला तर शक्तीसिंह याने चपळाईने सफेद पांढरा भारदस्त घोडा निवडला.अफगाणी निळा असलेला घोडा म्हणजेच महाराणांचा आवडता घोडा 'चेतक' होय.बहादूर,संवेदनशील,स्वामीनिष्ठ असे अनेक गुण चेतकमध्ये टप्प्याटप्प्याने आलेत.
१५६७ मध्ये अचानक सम्राट अकबराने चितौड गड आपल्या सैन्याच्या बळावर काबीज केला.राणा उदयसिंह गोगुंडाला गेले.तेथूनच त्यांनी मोगलांशी लढा दिला.पुढे त्यांचे निधन होताच.राजकुमार जगमल याला वारस म्हणून नेमावे अशी धीरबाई जी उदयसिंहाची आवडती राणी होती तिने राणांकडून वचन घेतले होते.परंतू जगमलमध्ये राजामध्ये असणारे गुण नव्हते.महाराणा प्रताप हेच खरे वारसदार होते अन् राजात असणारे सर्व गुणही त्यांच्यात होते.चितौड व जनता यांविषयी विशेष प्रेम असल्याने दरबारातील जेष्ठांनी त्यांना आपला राजा म्हणून निवडले.
महाराणा प्रताप यांनी राज्यभिषेकावेळीच मोगलांशी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शपथ घेतली आणि आपली राजधानी मेवाड कुंभलगड येथे हलवली.मेवाडी जनतेत त्यांनी स्वातंत्र्याची आणि मातृभूमीविषयी प्रेमाची ज्योत पेटवली.स्वाभिमानी असलेले महाराणा हे सम्राट अकबराच्या सैन्याशी चितौड स्वतंत्र करण्यासाठी लढतच राहिले.महाराणा प्रताप हे ८० किलो वजनाचा भाला,१२ किलोवजनाचे छाती कवच बाळगायचे.त्यांच्याजवळ भाला,कवच,ढाल आणि दोन तलवारी यांचे मिळून २०८ किलो एवढे भरायचे.आजही या वस्तू मेवाड म्युजियममध्ये सुरक्षित आहेत.दोन तलवारी ते बाळगायचे.खरे क्षत्रिय निशस्र असलेल्यांवर वार करत नाहीत,म्हणून ते शत्रूला दुसरी तलवार देत असत.महाराणा यांना अजबदे नावाची पहिली पत्नी होती.अमरसिंह हा मोठा मुलगा होता.अनेक निर्णयात त्यांची पत्नी त्यांना मदत करत असे.त्यांना अजबदे या राणी व्यतिरिक्त अन्य ११ राण्या होत्या.
सम्राट अकबराला शांततेनेच महाराणा प्रतापाने संधी करावी असे वाटे.स्वाभिमानी असलेले प्रताप त्यास राजी नव्हते.अनेक राजपूत राजांनी अकबराचे मांडलिकत्व स्विकारले होते.जगमलही त्यास जाऊन मिळाला होता.वैवाहिक संबंध स्थापन करून आपला स्वाभिमान,मर्यादा अनेक राजपूत राजे विसरले होते.१५७२ पासून चार वेळेस मैत्रीचा संदेश सम्राट अकबराने महाराणांकडे पाठविला होता.परंतू त्यांनी तो नाकारला होता.स्वातंत्र्य हेच सर्वस्व मानणारा महाराणा अकबराच्या कुटनितीला बळी पडला नाही.तह होऊ शकला नाही.शेवटी १५७६ मध्ये अकबराने राजपूत राजा मानसिंह आणि मुलगा सलीम यास मेवाडविरूद्ध युद्ध करण्यास पाठविले.
महाराणा प्रतापांना याचा सुगावा लागताच तेही दरबारातील सैन्याला तयार करू लागले.चर्चा करू लागले अन् हल्दीघाटातच युद्ध करावे असे ठरले.इतिहासकारांच्या माहितीनुसार ८० हजार मुगल सैन्य अन् २० हजार राजपूत सैन्य यांचे युद्ध अखेर सुरू झाले हल्दी घाटात.घनघोर युद्ध झाले.या लढाईचा निकाल लागला नाही परंतू मोगल सैन्याचं प्रचंड नुकसान या युद्धामुळे झाले होते.महाराणा प्रताप शत्रूवर तुटून पडले होते.भयंकर युद्ध सुरू होते.हकीम खा सुरीसारखे अनेक सरदार नेटाने लढत होते.यातच महाराणा व चेतक जखमी झाले होते.मानसिंग झाला याच्या समय सुचकता दाखविली व महाराणांचा वेश परिधान करून शत्रूशी लढू लागला.चेतकने आपल्या स्वामीस जखमी महाराणा प्रतापांना सुखरूप मोठी दरी पार करून पोहोचविले.स्वतः गतप्राण झाला.शत्रूचे पाठलाग करणारे दोन सैनिक यांचा बंदोबस्त शक्तीसिंहाने केला.अन् अकबरास जाऊन मिळालेला भाऊ पुन्हा मेवाड रक्षणाकरिता महाराणास मिळाला.
हल्दी घाटीच्या युद्धानंतर सम्राट अकबराने दक्षिणेकडे आपला मोर्चा वळविला.महाराणा प्रतापाने पुढे जंगलात राहून दिवस काढलेत.आदिवासी बांधवांची मदत घेत त्यांनी मेवाडच्या स्वातंत्र्याची शपथ घेतली.पुढे हळूहळू त्यांनी सतत ३० वर्षे संघर्ष करत आपला खूप मोठा प्रदेश मोगलांच्या ताब्यातून मिळवला.शेजारच्या राजांची मदत घेत मेवाड,चितौड स्वातंत्र्य केला.सर्वदूर संघर्षाचा वणवा पेटता ठेवला.एकामागून एक पर्वतासमान संकटांना महाराणा तोंड देत होते.शेवटी या स्वातंत्र्यसूर्याचे १९ जानेवारी १५९७ रोजी निधन झाले.
सम्राट अकबरास महाराणांची निधनाची बातमी कळताच डोळ्यांतून अश्रू गाळत तो म्हणाला,"शत्रू असावा तर असा". मेवाड इतिहासकार कर्नल टॉड लिहतो,'अपरिमित संपत्ती,प्रबळ महत्त्वाकांक्षा,शासन निपुनता यांच्या जोरावर दृढनिश्चयी,धैर्यशाली,उज्ज्वल कीर्तीमान,साहसी प्रतापाला नमविण्याचा प्रयत्न केला,'पण तो अयशस्वी ठरला."
असा हा भारताचा सुपुत्र महाराणा प्रताप मातृभूमी रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढत राहिला आणि साहस,शौर्य,स्वतंत्रता,स्वाभिमान,त्याग,हौतात्म्य अशा विविध गुणांची शिदोरी आधुनिक भारतास देऊन गेला.त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कतृत्वास शतशत नमन...!
-
भरत विठ्ठल पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर
ता.मालेगाव जि.नाशिक
9665911657
bharatpatil7988@gmail.com
🚩⛳⚔🚩⛳⚔🚩⛳⚔🚩⛳

Comments
Post a Comment