आर्य चाणक्य
🗞 दैनिक मालेगावचा बालेकिल्ला 🗞
दि.२५ सप्टेंबर २०१८
🍂 सुवर्णपानं इतिहासाची 🍂
आर्य चाणक्य
अंदाजित - इ.स.पू.३७५-इ.स.पू.२८३
अखंड भारताचे स्वप्नं ज्यांनी अंतिम श्वासापर्यंत बाळगलं,परकीयांचा प्रखर विरोध करून पारतंत्र्यांचे भविष्यातील होणारे परिणाम लक्षात घेऊन भारतीय राजांना स्वातंत्र्याचा अर्थ सांगणारे,प्रत्यक्ष मदत करणारे थोर विचारवंत,अर्थशास्त्र आणि राजनिती या विषयावर मानवी जीवनाला दिशादर्शक ठरणारा 'चाणक्यनिती' वा 'दंडनिती' हा ग्रंथ लिहणारे व अंमलात आणणारे थोर आचार्य,बुद्धीवंत,किर्तीवंत,नेतृत्वकर्ते,इतिहासात चाणक्य,विष्णुगुप्त तथा कौटिल्य या नावांनी ओळखले जाणारे आर्य चाणक्य हे प्राचीन भारताला पडलेलं भव्यदिव्य वास्तवातील स्वप्नंच...!
इतिहास नाकारू शकत नाही असं व्यक्तीमत्व आर्यावर्त असलेल्या भारतात झालं.भलेही त्यांच्या जन्माविषयी,जीवनातील घडामोडींविषयी इतिहासात एकमत नसेल,पण त्यांनी दिलेली आपल्या आयुष्यातील आहुती संपूर्ण भारताला प्रेरणादायी,मार्गदर्शक ठरलेली आहे.
नंद राजवटीतील पाटलीपुत्र येथे चाणक्य तथा विष्णुगुप्त यांचा जन्म 'चणक' नामक आचार्याच्या घरी झाला.त्यांच्या नावावरूनच आर्यांना 'चाणक्य' हे नाव पडले असावे.लहानपणापासूनच चाणक्य हुशार व प्रतिभावंत होते.एकदा जंगलात फिरत असतांना त्यांचा पाय काटे असलेल्या एका छोट्या काटेरी झुडूपावर पडला.त्यांच्या पायातून खूप रक्त आले आणि त्यांना खूप वेदना झाल्या.झुडूपाचा प्रचंड राग आल्याने त्यांनी परिसरातील ही झाडी जोपर्यंत नष्ट करीत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी शपथच घेऊन टाकली.उपलब्ध असलेल्या साधनांसह सर्व झाडी मुळासकट उपटून काढली.या प्रसंगावरून चाणक्य आपल्या ठरवलेल्या गोष्टीविषयी किती एकनिष्ठ होते हे कळते.एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी ते स्वतःला झोकून देत आणि पूर्ण होईपर्यंत मागे हटत नसत.दृढनिश्चय हा त्यांचा जीवनाचा स्थायीभाव होता हे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगावरून दिसून येते.
चाणक्यांचे गुरू तथा वडील चणक हे प्रतिभावंत शिक्षक होते.त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांनी संस्कृत ज्ञान,वेद पुराण यांचं ज्ञान घेतले.नंद घराण्यातील चुकीच्या धोरणांवर त्यांनी टीका केल्याने त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि जनतेसमोर फाशी देण्यात आली.चणक परिवाराचे पुढे जगणे असह्य झाल्याने विष्णुगुप्त चाणक्याने शिक्षणासाठी तक्षशिला येथे प्रयाण केले.तेथेच त्यांनी चार वेद,अर्थशास्त्र,न्यायशास्र,चिकित्साशास्र,राजनितीशास्र,धनुर्विद्या,अठरा कला इ.विविध स्तरातील उच्च विद्या इतर विद्यार्थ्यांसोबत हस्तगत केली.स्वतःमधील विविध गुणांचा उपयोग करत त्यांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.लकाकणाऱ्या हिऱ्याप्रमाणे त्यांचे व्यक्तीमत्व होते.उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते तक्षशिला येथेच आचार्य म्हणून कार्यरत झाले.अर्थशास्त्र व राजनितीशास्र प्रचंड अभ्यास आणि शिष्यांमधील लोकप्रियता यामुळे त्यांची सर्व देशभर चर्चा होती.चाणक्यांच्या मार्गदर्शनाखालीच भारतातील अनेक राज्यांचे मंत्री तयार झाले होते.
लहानपणी घेतलेली शपथ आणि मगध महाजनपदाच्या पाटलीपुत्र येथे धनानंद या नंद राजाने माजवलेली अराजकता,विलासी,लोभी जीवन त्यामुळे जनतेची होत असलेली वाताहत म्हणून ते पुन्हा पाटलीपुत्र आले.देशप्रेमाचे धडे आणि पाटलीपुत्र अवस्था यावर धनानंदशी गाठभेट होवून चर्चा केली,पण धनानंदने उलट त्यांचा अपमान केला.केलेला अपमान जीवारी लागल्याने चाणक्यांनी शपथच घेऊन टाकली,की जोपर्यंत नंद घराण्याचा शेवट होत नाही तोपर्यंत केसांची गाठ बांधणार नाही.मगधच्या धनानंद राजाच्या जुलूमातून जनतेला सोडविण्यासाठी चंद्रगुप्त नावाच्या शिष्यास प्रभावी शिक्षण दिले.सलग आठ वर्षे विविध स्तरातील उच्च शिक्षण चंद्रगुप्तास त्याच्यातील विविध गुणांमुळे आणि तो करत असलेल्या मेहनतीमुळे त्यास भेटत गेले.याच काळात विश्वविजय मोहिमेवर निघालेला सिकंदर हा भारतीय सीमेवर येऊन पोहोचला होता.गांधारनरेश आंभी याने पौरव राज्यावर आक्रमण करण्यासाठी सिकंदरास मदत करण्याचे ठरवले.चाणक्यांनी आंभीराजला समजावण्याचे प्रयत्न केलेत पण सारे निष्फळ ठरले.अखेर पौरव राजा पुरू आणि सिकंदर यांच्यात मोठे युद्ध झाले.यानंतर चाणक्यांनी चंद्रगुप्तच्या मदतीने अनेक राजांना सिकंदर विरोधात एकत्र केले,परकीयांविरूद्ध प्रेरित केले आणि विरोध करतच राहिले.सिकंदराच्या सेनेतील विचारांची फुट आणि त्यांचा निरूत्साह यामुळे सिकंदर माघारी फिरला अन् वाटेतच त्याचा मृत्यू झाला.परंतु त्याने जिंकलेल्या भागात आपल्या क्षत्रपांची नेमणूक केली होती.त्यामुळे पश्चिम वायव्य भागात ग्रीकांची सत्ता होतीच.त्यांच्याविरुद्ध स्वातंत्र्य युद्धासाठी चाणक्यांनी आपल्या शिष्यांना प्रेरित केले.जनजागृती केली.अन् प्रचंड संघर्ष करत ग्रीकांना हुसकावून लावले.
चाणक्यांनी पुढच्या काळात चंद्रगुप्तास मगधवर आक्रमण करण्यास सांगितले.त्यांनीही आजूबाजूच्या छोट्या छोट्या जनपदांना सोबत घेऊन पुढे मगध जिंकून घेतले.चाणक्य यांनी आपली शपथही पूर्ण केली.चंद्रगुप्त मोर्य यास मगध सम्राट म्हणून नियुक्त करत मौर्य घराण्याची स्थापना केली.यात चाणक्यांचा सिंहाचा वाटा.
स्वतः कोणतेही पद न घेता गंगा तटावर झोपडी बांधून ते राहू लागले.तेथूनच ते चंद्रगुप्तास कल्याणकारी राज्याचे धडे देऊ लागले.विचारमंथनातून पुढे कौटिलीय 'अर्थशास्त्र' हा महान ग्रंथ त्यांनी लिहला.२५ प्रकरणे आणि सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ भारतीय इतिहासातील अर्थशास्त्र आणि राजनिती विषयावर लिहलेला मानबिंदूच.या ग्रंथात असलेल्या नितीस 'चाणक्यनिती' वा 'दंडनिती' म्हणून ओळखतात.हा ग्रंथ गद्य स्वरूपात असून संस्कृतभाषेत आहे.मौर्यकाळाचा सामाजिक इतिहासाचा तो आरसाच आहे.या ग्रंथात त्यांनी कल्याणकारी राज्यासाठी सप्तांग सिद्धांत सांगितला आहे.यात स्वामी,अमात्य,जनपद,दुर्ग,कोष,दंड व मित्र यांचा समावेश आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात चाणक्याच्या अर्थशास्राच्या हस्तलिखिताचा इ.स.१९०५ साली शोध लागला.डॉ.शामाशास्री या जगविख्यात संस्कृत भाषातज्ज्ञ यांनी इ.स.१९१५ साली इंग्रजी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध केला.
स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा आचार्य,अन्याय अत्याचार याविरुद्ध संघर्ष करणारा कर्मयोगी,स्वाभिमानी असणारा आर्य चाणक्य,विष्णुगुप्त,कौटिल्य प्राचीन भारतालं पडलेलं भव्यदिव्य सोनेरी वास्तवातलं स्वप्नंच.इतिहासानं आजच्या आधुनिक राजकारणातही मार्गदर्शक ठरावं असं 'चाणक्यनिती' नावाचं इतिहासाचं सुवर्णपानं दिलेय हे दिशादर्शकच...!
📝भरत विठ्ठल पाटील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर
९६६५९११६५७
bharatpatil7988@gmail.com

Comments
Post a Comment