चक्रवर्ती सम्राट अशोक


सुवर्णपानं इतिहासाची

चक्रवर्ती सम्राट अशोक 
(इ.स.पू ३०४ - इ.स.पू.२३२)

      प्राचीन भारतापासून आजतागायत महान आणि शक्तिशाली सम्राटांमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेले चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जन्म धर्मा व बिंदूसार यांच्या मौर्य राजपरिवारात झाला.लहानपणापासून अशोक  खोडकर,तापट,चांगले शिकारी होते.सेनानी बनण्याचे गुण असल्याने बिंदूसारने त्यांस अवंतीचा उठाव मोडण्यास पाठविले होते.त्यांनी ते सहज मोडून काढले.अनेक मोहिमा यशस्वी केल्याने त्यांचे राजदरबारातील नेतृत्व आणि लौकिक वाढत गेले.राज्यभर कीर्ती वाढत गेली.कौटुंबिक कलहावर यशस्वीरित्या मात करत बिंदूसार यांच्या मृत्यूनंतर मगध साम्राज्याचा सम्राट बनले.
        राज्यरोहण झाल्यानंतर अवघ्या आठ वर्षाच्या काळात अनेक प्रदेश सम्राट अशोकांनी मगध साम्राज्यास जोडले.दक्षिणेस केरळ,उत्तरेस अफगणिस्तान,पूर्वेस ब्रम्हदेश तर पश्चिमेस बलुचिस्तान इराणपर्यंत साम्राज्यविस्तार सम्राट अशोकांनी केला.एकछत्री सत्ता लागू केली.अशोकांची महत्त्वाकांक्षा वाढतच गेली.शेजारचे सर्व राज्य त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राखत असत.सर्वत्र त्यांची चंड अशोक अशी ओळख निर्माण झाली होती.असे असतांनाही मध्य भारतात एक स्वतंत्र राज्य होते 'कलिंग'.समुद्र किनाऱ्यावर सत्ता काबीज करून बाह्य जगाशी व्यवसाय करणे,खनिज समृद्ध कलिंगवर सत्ता काबीज केल्यावर होणारी भरभराट आणि मौर्यांच्या आधीच्या मोहिमांना आलेले अपयश यामुळे कलिंगवर केलेली मोहिम सम्राट अशोक आणि भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन गेले.
     सम्राट अशोकांचे डावपेच आणि बलाढ्य सैन्यापुढे कलिंग राज्याचा पराभव झाला.लाखो लोकांचा,सैन्याचा मृत्यू,लाखो जखमी.अमानुष अत्याचार,नरसंहार यामुळे सर्वत्र प्रेतांचे ढीगच दिसत होते.प्रेतं,जळालेली घरे,शेती व मालमत्ता यांचे प्रचंड नुकसान पाहून सम्राट अशोक खूपच उदास झाले.त्यांस प्रश्न पडला,की यासाठीच कि मी हे युद्ध जिंकले?,हा विजय नाहीतर पराजय आहे.या विनाशाचे कारण स्वतःला मानले आणि इतिहास बदलला.
    विनाशकारी कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.अहिंसा,शांती,प्रेम,दया या तत्वांचा पुरस्कार केला.बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला.मुलं महेंद्र आणि संघमित्रा यांनी श्रीलंकेत जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार केला.हजारो स्तूप व विहारांची निर्मिती त्यांनी  केली.शिकार बंदी,पशु हत्याबंदी केली.सर्वधर्मसमभाव धोरण राबविले.कैद्यांना सहिष्णूपणे वागविले,शेतकऱ्यांना पाण्याचे कालवे,गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करणे,रस्तेनिर्मिती,रस्त्याच्या बाजूला झाडे लावणे इ.विविध समाजपयोगी कार्ये त्यांनी केली.ही सर्व अजरामर कीर्ती स्वरूपातील कामगिरी लक्षात येते ती त्यांनी उभारलेल्या शिलालेखांमुळेच.ऐतिहासिक वारसा भारतास दिला तो म्हणजे  लिखित शिलालेख.अनेक स्तुतीपर शिलालेखांमुळे प्राचीन भारताची परिस्थिती आणि सम्राटाची गौरवगाथा आपणांस कळते.शिलालेखांव्दारेच त्यांनी आपले विचार प्रकट केले.इ.सपू.२६८ ते इ.स.पू.२३२ या काळात त्यांनी भारतीय उपमहाव्दिपवर राज्य केले. त्यांच्या सैन्याचे सामर्थ्य अफाट होते.गुप्तहेर खाते प्रभावी होते.सारनाथ येथील प्रसिद्ध अशोक स्तंभ हे भारताने स्विकारलेलं राष्ट्रीय चिन्ह ही त्यांचीच ऐतिहासिक देण आहे.
      अखंड भारतावर राज्य केल्याने त्यांना चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखले गेले.पाटलीपुत्र राजधानी असलेल्या मगध साम्राज्याची कीर्ती त्यांनी आपल्या कर्तृत्वाने पसरविली.'देवनामप्रिय प्रियदर्शी' म्हणजे देवांचा प्रिय व चांगले दाखविणारा अशी उपाधी धारण केली."आजपर्यंतच्या इतिहासातील सम्राटांमध्ये एकमेव सम्राट असतील,ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला की,भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायाचे नाही."उरलेले सर्व आयुष्य त्यांनी लोककल्याणासाठी खर्च केले.सुवर्णकाळ निर्माण केला.आदर्श शासनकर्ता,शांतताप्रिय,सामर्थ्यशाली चक्रवर्ती सम्राट अशोकांचा वैभवशाली काळ भारतीय इतिहासाला लाभलेलं सुवर्णपानंच..!

- भरत विठ्ठल पाटील
जि.प.प्राथ.शाळा माळीनगर ता.मालेगाव 
9665911657

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज

वर्धमान महावीर