पृथ्वीराज चव्हाण
सुवर्णपानं इतिहासाची
पृथ्वीराज चौहान
इ.स.११६३ - इ.स.११९२
आर्यावर्त भारताची शौर्याची आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा खूप मोठी आहे.त्यात 'राजपूताना' इतिहास आपणास प्रभावित करित असतो.राजपूतान्याचा संबंध इतिहास शौर्य,त्याग,बलिदान यांनी भरलेला आहे.या कीर्तीस्तंभ म्हणून सर्वात आकर्षित करत असलेलं इतिहासाचं सुवर्णपान म्हणजे दिल्लीचं तख्त राखणारे शेवटचे हिंदूसम्राट,राय पिथौरा,भारतेश्वर अशा नावांनी ओळखले गेलेले पृथ्वीराज चौहान.
राजपूत इतिहासातील चाहमन तथा चौहान घराण्यात प्रसिद्ध असलेला राजा सोमेश्वर यांना पृथ्वीराज व हरिराज अशी दोन मुलं व पृथा नावाची मुलगी होती.पृथ्वीराज वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी गादीवर बसले.आई कर्पूरदेवी यांनी कदंबवास या विश्वासू मंत्र्याच्या सहाय्याने राज्यकारभार चालविला.युद्धातील अनेक अनमोल गुण त्यांच्यात होते.युद्ध कुशल असलेले पृथ्वीराज यांचं शब्दभेदी बाणचं कौशल्य आणि धर्नुविद्या अभ्यास चांगला होता.विविध भाषांचा त्यांचा अभ्यास होता.
त्या दिवसात दिल्लीचा कारभार चालविणाऱ्या अनंगपाल शासकांनी पृथ्वीराज चौहान यांना दिल्लीचे शासक बनविण्याचे ठरविले व तशी सूत्रेही देऊन टाकली.अजमेर आणि दिल्ली अशी दोन्हीही ठिकाणची गादी त्यांना सांभाळावी लागली.अंतर्गत कलहांवर मात करीत काही वर्ष दिल्ली राज्य केल्यावर राज्यातील लोकांची आपुलकी आणि प्रेम मिळविण्यात पृथ्वीराज यशस्वी ठरलेत.त्यांच्या बालपणाच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.बालपणातच त्यांनी वाघाचा जबडा हातांनी फाडला होता.इतिहासकारात अनेक घटनांवरून मतभेद जरी असले तरी त्यांच्या शौर्याची गाथा कोणीही नाकारू शकत नाही.
त्यांच्या कालखंडातील लिखित पुस्तक चंद बरदाई यांचे 'पृथ्वीराज रासो'(हिंदी) व त्यांचा आश्रित कवी जयानक यांचे 'पृथ्वीराजविजय' (संस्कृत) यात सर्व घटनांचा उल्लेख आलेला आहे.त्या काळातील कोरीव लेख,मुस्लिम साहित्यातही त्यांच्या शौर्याविषयी,राज्यकारभाराविषयी उल्लेख आलेला आहे.विशाल सेना लाभलेले आणि साम्राज्यप्रती अतीव प्रेम असलेले पृथ्वीराज चौहान भारतीय इतिहासाला लाभलेले अविस्मरणीय योद्धेच आहेत.
तरूण असलेले पृथ्वीराज यांची प्रेमकथा ही प्रसिद्ध आहे.कन्नोजचे राजा जयचंद यांची मुलगी संयोगिता ही खूप रूपवान होती.मतभेदांमुळे अनेक राज्यातील युवराजांना निमंत्रण जयचंदने दिले पण पृथ्वीराज यांना न देता राजदरबारात त्यांचा पुतळा बसविला आणि अपमान केला.स्वयंवर निवडण्याच्या ऐनवेळेस उपस्थित राहून संयोगिताच्या सहमतीने तेथून पळ काढला अन् राजधानीत पोहोचल्यावर विवाह करून घेतला.राजा जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यात पुन्हा शत्रूत्व निर्माण झाले.पृथ्वीराज यांना जम्भावती,दाहिया,गुजरी,इंद्रा वती,संयोगिता अशा विविध तेरा राण्या होत्या.
परिवारातील बंड अन् शेजारील राज्यांचे बंड त्यांनी मोठ्या शिताफीने मोडून काढले.पराक्रमी असलेले राजे म्हणून त्यांची ओळख होऊ लागली.त्याचवेळेस परकीय आक्रमणाचे ढग दिल्लीवर जमू लागलेत ते शिहाबुद्दीन मुहम्मदच्या रूपाने.इतिहासातील नोंदीनुसार मोहम्मद गौरीने अनेकदा आक्रमण केलीत पण तो अपयशी ठरला.तहशीलवर राज्य करणाऱ्या भादानकांवर स्वारी करून दिग्विजयकरिता पृथ्वीराज दिल्लीतून बाहेर पडलेत.बुंदेलखंडावर चंदेल्ल राजावर स्वारी केली.गुजरातवर आक्रमण अपयशी ठरल्यावर चालुक्य नृपती दुसरा भीम यांच्याशी तह करून युद्ध थांबविले.
पुढे ११९१ मध्ये मोहम्मद गौरी आणि पृथ्वीराजाच्या राज्यावर आक्रमण करून तबरहिंदचा दुर्भेद्य किल्ला हस्तगत केला आणि धुमाकुळ माजविला.तेव्हा पृथ्वीराजाने मोठी फौजनिशी पंजाबात भतिंड्यापासून जवळ असलेल्या तराईन युद्धात मुहम्मदचा पराभव केला.राजपुतांनी त्याचा पाठलाग न करता त्यास जाऊ दिले.या पराभवाचे शल्य मनात असल्याने पुन्हा जयचंदच्या मदतीने मुहम्मद गौरीने दुसरे तराईनचे युद्ध छेडले.पृथ्वीराजाने उत्तर भारतातील अनेक राजांची मदत यावेळी घेतली पण माघार घेऊ असा खोटा संदेश पाठवून आणि दगाबाजी करून गौरीने गाफील राजपूत सैन्यावर आक्रमण केले आणि विजय मिळविला.यात पृथ्वीराज पकडला गेला.अमानवी अत्याचार यावेळेस पृथ्वीराजशी केले गेले.गरम लोखंडाने त्यांचे डोळे काढले गेलेत.इतिहासातील विविध साहित्यात मोहम्मद गौरी मृत्यू आणि पृथ्वीराज चव्हाण शब्दबाण यात मतभेद आहेत. इतिहासानुसार चंदबरदाई हा त्यांचा मित्र त्यांच्यासोबतच होता.शेवटची इच्छा बाण चालविण्याची बोलून दाखविल्याने त्यांची बाण चालविण्याची कला मुहम्मद गौरीचा वध करण्यास कारणीभूत ठरली.राजदरबारात पृथ्वीराज आपली कला सादर करणार होते.चंदबरदाई म्हणतात-
चार बांस चौबीस गंज अंगुल अष्ट प्रमाण,
ता ऊपर सुल्तान है मत चूको रे चौहान.
असा दोहा बोलून संकेत मिळताच गौरी बसलेल्या दिव्यांग असलेले पृथ्वीराज चौहान यांनी शब्दभेदी बाणाने मुहम्मद गौरीस मारले आणि मित्र चंदबरदाई सोबत एकमेकांची गौरी सैन्यापासून वाचण्यासाठी चाकूने भोसकून हत्या करून घेतली.आजही अफगणिस्तानमध्ये त्यांची समाधी आहे.
भारताच्या भूमीत अनेक युद्धांनी आणि महायोद्धा यांनी जन्म घेतला.जन्म मृत्यूच्या दुनियेत ही लोकं जगलीच नाहीत.आपल्या कर्तृत्वाने ही जगावेगळी महापुरूष आपल्यात आजही आहेत.इतिहासात तब्बल अठरा वेळेस युद्ध करूनही सतरा वेळेस मुहम्मद गौरीस पराभव स्विकारावा लागला.भारतभूमीला परकीयांच्या आक्रमणापासून वाचविणारा महान योद्धा,चांगला मित्र,सच्चा प्रेमी,कर्तृत्ववान राजा,दिल्लीचे तख्त राखणारा शेवटचा हिंदूसम्राट,युगपुरुष असलेले पृथ्वीराज चौहान आर्यावर्त भारतालं लाभलेलं सुवर्णपानंच.
भरत विठ्ठल पाटील
९६६५९११६५७

Comments
Post a Comment